Home विभागनिहाय शासकीय योजनाघरकुल: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा घरकुल: अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण

घरकुल: अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण

by GR Team
0 comments 825 views

अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण 14-1-19 अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देणेबाबत.
महाराष्ट्र शासन उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. :-इबांका २०१८/प्र.क्र.२०८/कामगार
दिनांक : १४ जानेवारी, २०१९

योजनेचे स्वरूप :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी मंजुर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे.
अ. मंडळाकडील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रू. १.५० लक्ष अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर (MGNREGA) अनुज्ञेय असणारे रु. १८,०००/- तसेच स्वच्छ भारत अभियानद्वारे शौचालय बांधण्यासाठी अनुज्ञेय असलेले रू.१२,०००/- असे एकूण रु. ३००००/- अनुदान रु. १.५० लक्ष मध्ये समाविष्ट असल्याने संबधित योजनांचा दुबार लाभ देय राहणार नाही.
घराचे क्षेत्रफळ :-
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र ठरलेल्या बांधकाम कामगारांनी किमान २६९ चौ. फुट इतके चटई क्षेत्र असलेले घर बांधकाम करणे आवश्यक आहे. त्याकरिता रु. १.५० ल्क्ष एवढे अनुदान देय राहील. मात्र, लाभार्थ्यास त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे बांधकाम स्वखर्चाने करण्यास मुभा राहील.
लाभार्थी पात्रता :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी असून त्याचा लाभ घेण्यासाठीची पात्रता खालील प्रमाणे आहे:-
अ. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार हा नोंदणीकृत (सक्रिय) असावा तथापि अर्ज करतांना तो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सलग एक वर्षापेक्षा अधिक, बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असावा.
आ. नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावावर महाराष्ट्र राज्यात पक्के (सिमेंट, वाळूने बांधलेले) घर नसावे. तशा आशयाचे स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
इ. नोंदीत बांधकाम कामगारास पक्के घर बांधण्यासाठी स्वतःच्या / पती / पत्नीच्या नावे मालकीची जागा असावी अथवा मालकीचे कच्चे घर असलेल्या त्या ठिकाणी घर बांधता येईल.

ई. बांधकाम कामगारानी शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनांचा लाभ घेतलेला नसावा. मंडळाकडील देय गृहकर्जावरील व्याज परतावा करीता अनुज्ञेय अर्थसहाय्याचा / अनुदानाचा लाभघेतलेला नसावा. याबाबत त्यांनी स्वयंघोषणापत्र / शपथपत्र सादर करणे आवश्यक राहील.
उ. अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) लाभ प्रति कुटुंबासाठी आहे.
ऊ. एकदा लाभ घेतल्यानंतर बांधकाम कामगार पुनश्चः या योजनेच्या लाभास पात्र राहणार नाही.
ए. नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ट नसावा.
आवश्यक कागदपत्रे :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा ((ग्रामीण) लाभ घेण्यासाठी विहीत अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे:-
अ) सक्षम प्राधिकाऱ्याने नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
आ) आधारकार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डाची प्रत.
इ) ७/१२ चा उतारा / मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र / ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा
ई) लाभधारकाचे स्वतःच्या नावे कार्यरत असलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकीत प्रत

घराची रचना :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील (ग्रामीण) घराची रचना खालील प्रमाणे आहे.
अ) संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे. घरकुलामध्ये एक स्वयंपाकघर व बैठक हॉल यांचा समावेश असावा. शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहिल.
आ) जोत्यापासून घराची उंची कमीत कमी १० फूट असावी.
इ) छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.
ई) घराच्या दर्शनीभागावर मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) लावणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची, त्याची छाननी करण्याची आणि अर्थसहाय्य देण्याची कार्यपध्दती :-
अ) नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगारानी प्रथम जिल्हा कार्यकारी अधिकारी / उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडे मंडळानी विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करावा.
आ) बांधकाम कामगाराकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अर्जदाराची पात्रता तसेच अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राची जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती तपासणी करेल व त्यात पात्र झालेल्या बांधकाम कामगाराची अटल बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये (ग्रामीण) लाभार्थी म्हणून निवड करेल.
इ) उप जिल्हा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सदस्य सचिव सनियंत्रण समिती हे सनियंत्रण समितीच्या छाननीत पात्र झालेल्या आणि मंजुरी दिलेल्या बांधकाम कामगारांची तालुका निहाय यादी तयार करतील. सदर यादी सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करतील आणि त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना उपलब्ध करुन देतील.
ई) सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे ग्राम विकास विभाग यांच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण विभाग, नवी मुंबई याचेकडे पात्र बांधकाम कामगार यांचे घरकुल बांधकामा पोटी निधी वर्ग करतील.
उ) घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार संचालक, राज्य व्यवस्थापन कक्षाकडून टप्प्या टप्प्याने ठरवुन दिलेले बांधकाम पुर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) प्रणालीद्वारे बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल.
ऊ) योजनेंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या अनुदानातून ४% एवढी रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयास प्रशासकीय खर्चासाठी देय राहील.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

वेबसाइटचा उद्देश :-https://gr.ravindrachavan.in/ मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि परिपत्रके यांचा संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे हा आहे. यामुळे नागरिक, संशोधक, आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते. 

या संकेतस्थळावर दिनांक निहाय व विषयनिहाय शासकीय निर्णय, राजपत्र, आणि इतर महत्वाचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यामुळे नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होते.

© 2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept

Privacy & Cookies Policy